सोलापुरात टोमॅटो, वांगी, हिरवी मिरचीत ,बाजारभावात तेजी कायम
मंगळवेढा न्यूज 8 सप्टेंबर 2020.
बाजारभाव बातमीपत्र.
सोलापुरात टोमॅटो, वांगी, हिरवी मिरचीत ,बाजारभावात तेजी कायम
.
सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात टोमॅटो, वांगी, हिरवी मिरचीला पुन्हा एकदा चांगली मागणी राहिली. त्यामुळे संपूर्ण सप्ताहभर त्यांच्या दरात तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात टोमॅटोची आवक प्रतिदिन ५०० ते ७०० क्विंटलपर्यंत, तर हिरव्या मिरचीची १० ते १५ क्विंटलपर्यंत राहिली. तर, वांग्यांची २० ते ३५ क्विंटलपर्यंत आवक राहिली. मागणीच्या प्रमाणात आवक काहिशी कमी राहिल्याने त्यांच्या दरात तेजी राहिली. गेल्या पंधरवड्यापासून किरकोळ चढ-उतार वगळता त्यांचे दर तेजीत आहेत. टोमॅटोला प्रतिक्विंटलला किमान ४०० रुपये, सरासरी १६०० रुपये आणि सर्वाधिक ३३०० रुपये, वांग्यांना किमान ७०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, तर हिरव्या मिरचीला किमान २००० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर मिळाला.
त्याशिवाय फ्लॅावर, कोबी यांनाही बऱ्यापैकी मागणी राहिली. त्यांची आवक मात्र प्रतिदिन ४ ते ५ क्विंटल अशी राहिली. फ्लॅावरला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी ९०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये तर कोबीला किमान ५०० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये असा दर मिळाला.
भाज्यामध्ये मेथी, शेपू, कोथिंबिरीचे दरही तेजीतच राहिले. त्यांची आवक प्रत्येकी ८ ते १० हजार पेंढ्यापर्यंत राहिली. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ८०० ते १००० रुपये, शेपूला ४०० ते ६०० रुपये आणि कोथिंबिरीला ८०० ते १२०० रुपये असा दर मिळाला.
Comments
Post a Comment