ऊस तोडणी यंत्र खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना भीमा साखर कारखाना मदत करणार
टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2020/21 च्या गळीत हंगामात ऊस तोडणी साठी जे शेतकरी ऊस तोडणी यंत्र खरेदी करतील त्यांना भीमा कारखाना थकहमीचे सहकार्य करणार असून, आतापर्यंत ऊस तोडणी यंत्र खरेदी करणाऱ्या दहा शेतकऱ्यांनी कारखान्याकडे तयारी दर्शविली असल्याची माहिती या कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी दिली.
चालू वर्षी कोरोना चा प्रादुर्भाव सर्वत्रच आहे. चालू वर्षी पाऊस काळ वेळेवर झाल्याने उसाच्या वजनात मोठी वाढ होणार आहे. प्रत्येक वर्षी साखर कारखाने कार्यक्षेत्रातील ऊस तोडणीसाठी बीड, जालना, औरंगाबाद, माजलगाव, जामखेड आदीसह अन्य भागातील ऊस तोडणी साठी मजुरांबरोबर करार करतात. वेळ प्रसंगी त्यांना आगाऊ आर्थिक ऊचल ही दिली जाते. मात्र चालू वर्षी करार केलेल्या पैकी कोरोनामुळे किती टोळ्या येतील या बाबत थोड़ी साशंकता आहे. गेल्या गळीत हंगामात अनेक साखर कारखान्यांनी यंत्राद्वारे ऊस तोडणी केली आहे.
चालू वर्षी काही शेतकरी ऊस तोडणी यंत्र खरेदी करणार आहेत यंत्राची किंमत ही लाखोच्या घरात आहे, त्यामुळे जे शेतकरी यंत्र खरेदी करतील त्यांना कारखाना थकहमीसाठी लागणारे सहकार्य करणार आहे. त्यामुळे ऊस तोडणी सोयीस्कर होणार आहे. जिल्ह्यात भीमा कारखान्याने असा प्रयोग बहुदा प्रथमच राबविल्याचे उपाध्यक्ष जगताप यांनी सांगितले.
जकराया खरेदी करणार दहा ऊस तोडणी यंत्र
वटवटे (ता. मोहोळ) येथील जकराया साखर कारखाना ऊस तोडणी साठी दहा यंत्र खरेदी करणार असून, यंत्र उत्पादक कंपन्या बरोबर त्यांची किंमत, कार्यक्षमता व दर्जा या बाबत प्राथमिक स्वरूपात बोलणी सुरू असल्याचे या कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी सांगितले. ऊस तोडणी यंत्राचे अनेक नमुने आहेत, मात्र शेतकऱ्यांचा ऊस कमी वेळेत नुकसान न होता कसा तोडला जाईल अशा प्रकारची यंत्र खरेदी करणार असल्याचे ही जाधव यांनी सांगितले.
Comments
Post a Comment