कोरोना लॉकडाऊन: विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही
कोरोना लॉकडाऊन: विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही
ANIऐन कोरोनाच्या संकटकाळात पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार आणि राज्यपाल आमने-सामने आलेत. यावेळी कारण ठरलंय ते विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा.
कोरोनाचं संकट पाहता परीक्षा न घेता आधीच्या वर्षाच्या गुणांवर आता निकाल लावता येईल का, असं पत्र महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला (UGC) लिहिलं. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली.
आता या प्रकरणात विविध पक्षांशी संलग्न विद्यार्थी संघटनांनीही उडी घेतल्यामुळे हे संपूर्ण प्रकरण आता विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडून राजकीय वळणावर लागलं आहे.
हा सर्व वाद नेमका सुरू कुठून झाला आणि आता कुठवर आलाय, हे सर्वप्रथम आपण पाहू. त्यानंतर शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ आणि विद्यार्थी संघटनांचं म्हणणं काय आहे, हे जाणून घेऊ.
महाराष्ट्र सरकारच्या समितीनं काय म्हटलं होतं?
देशभरात लॉकडाऊन असल्यानं शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षांवरही याचा परिणाम झालाय. इतर सर्वच परीक्षांइतकीच विद्यापीठाची अंतिम परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या परीक्षांबाबत निर्णयासाठी महाराष्ट्र सरकारनं एप्रिल महिन्यात एक समिती नेमली होती. या समितीचे समन्वयक मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, तर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, शिवाजी विद्यापीठाचे देवानंद शिंदे, SNDTच्या शशिकला वंजारी, तंत्र शिक्षण विभागाचे संचालक अभय वाघ आणि उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने हे सदस्य होते.
UDAY SAMANTया समितीने 6 मे रोजी अहवाल राज्य सरकारकडे सादर केला. विद्यापीठातील पदवीपूर्व आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी वगळून इतर विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्याची शिफारस या अहवालातून करण्यात आली होती. हा अहवाल राज्य सरकारनं 8 मे रोजी स्वीकारला.
त्यानंतर 8 मे रोजीच उच्च व तंत्र शिक्षणंत्री उदय सामंत यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह येत माहिती दिली की, "यूजीसीच्या नियमांनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्या लागतील, कारण या परीक्षांवर विद्यार्थ्यांचं करिअर अवलंबून असतं."
'या' पत्रावरून राज्यपाल संतापले
त्यानंतर विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा होणार असं वातावरण असताना, उदय सामंत यांनी विद्यापीठाच्या अंतिम परीक्षांबाबत विद्यार्थ्यांची मतं जाणून घेतली, आणि 17 मे 2020 रोजी विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात UGC ला पत्र लिहून, या संकटकाळात विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा घेणं व्यवहार्य ठरणार नसल्याचं मत कळवलं.
TWITTER/UDAY SAMANTउदय सामंत यांच्या याच पत्रावरून पुढचं राजकारण घडलंय. सामंतांनी UGCला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की, "महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती पाहिल्यास विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा जुलै 2020 मध्ये घेणं कठीण बाब वाटतेय. अंदाजे 8 ते 10 लाख विद्यार्थी असल्यानं परीक्षा घेणं व्यवाहर्य दिसत नाही. विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात टाकणे संयुक्तिक ठरणार नाही."
विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा न घेता, विद्यार्थ्यांना UGCच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रेड प्रदान करण्याच्या पर्यायाला मान्यता द्यावी, अशी विनंतीही उदय सामंत यांनी UGCला पत्रातून केली होती.
उदय सामंतांनी UGCला लिहिलेल्या या पत्रालाच 22 मे 2020 रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आक्षेप घेतला. नुसता आक्षेप घेतला नाही, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून नाराजीही व्यक्त केलीय.
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेणं म्हणजे UGCच्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन आहे. परीक्षा घेतल्याशिवाय डिग्री देणे योग्य ठरणार नाही, असं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं.
TWITTER/@MAHA_GOVERNORतसंच, उदय सामंत यांनी UGCला पत्र लिहिण्याआधी राज्यपालांना माहिती दिली नाही, याबद्दल नाराजीही कोश्यारींनी व्यक्त केली.
"परीक्षांशिवाय विद्यार्थ्यांचा निकाल लावल्यास त्यांच्या पुढील उच्च शिक्षणावर, पदवीवर आणि रोजगारावर परिणाम होईल," असं मत राज्यापालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून व्यक्त केलं.
सामंतांचं स्पष्टीकरण
राज्यापालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त करणारं पत्र पाठवल्यानंतर काही अवधीतच उदय सामंत यांनी व्हीडिओद्वारे आपली बाजू मांडली.
राज्यपालांचा गैरसमज झाल्याचं उदय सामंत म्हणाले.
सामंत यांनी स्पष्ट केलं की, "महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती, विद्यार्थ्यांची मानसिकता याबाबत माझं मत मी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (UGC) मांडलं. राज्यापालांना बाजूला केलं, विश्वासात घेतलं नाही, अशी कोणतीही गोष्ट नाही. माझं मत UGCकडे मांडणं हा काही गुन्हा नाहीय."
"विद्यार्थ्यांच्या भावना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 7 ते 8 विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे. UGCने माझ्या पत्राला अद्याप प्रतिसाद दिला नाहीय. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करूनच पत्र लिहिलं होतं. पण यामुळे जर राज्यपालांचा काही गैरसमज झाला असेल, तर त्यांच्याशी बोलून मी त्यांचा गैरसमज दूर करेन," असंही उदय सामंत यांनी म्हटलं.
विद्यार्थी संघटनांमध्ये एकमत नाही
विद्यापीठांच्या या परीक्षांच्या या प्रकरणात विद्यार्थी संघटनांनीही उडी घेतलीय.
आदित्य ठाकरे प्रमुख असलेल्या युवा सेनेनं 9 मे रोजीच पत्रक जारी करत विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. युवासेनेनं ही मागणी महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनंच केल्याची पत्रकात म्हटलंय.
युवासेनेच्या या मागणीशी काँग्रेसप्रणित NSUI ही संघटनाही सहमत आहे. सध्या कोरोनामुळे अनेक भाग पूर्णपणे बंद असल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय होईल. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी भूमिका NSUI नं मांडलीय.

Comments
Post a Comment