सोलापूरच्या ग्रामीण भागातील सलून, खासगी व सार्वजनिक वाहतूक आजपासून सुरु
सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या आदेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय ठप्प झाले होते. बंद असलेल्या अनेक उद्योग व व्यवसायांना उद्यापासून (शुक्रवार) सवलत देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी 20 मे रोजी घेतला असून 22 मे ते पुढील आदेश होईपर्यंत हा सुधारित आदेश लागू असणार आहे. या आदेशामुळे ग्रामीण भागातील व बिगर प्रतिबंधीत क्षेत्रातील क्रीडा, संकुल, स्टेडियम तसेच इतर सार्वजनिक मोकळ्या जागा या वैयक्तिक, सर्वासाठी खुल्या असणार आहेत.
प्रेक्षक, सांघिक क्रीडा प्रकार करण्यास मनाई असणार आहे. सर्व शारीरिक व्यायाम इतर उपक्रम सोशल डिस्टन्स पाळून करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व प्रकारची सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली असून तीन चाकी वाहन एक अधिक दोन व्यक्तींसाठी आणि चार चाकी वाहन एक अधिक दोन व्यक्ती या अटीवर परवानगी देण्यात आली आहे. जिल्हा अंतर्गत बस सेवा जास्तीत जास्त 50 टक्के इतक्या मर्यादेपर्यंत आणि सुरक्षित शारीरिक आंतर व स्वच्छतेचे नियम पाळून सुरू ठेवली जाणार आहेत. सर्व मार्केट, दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या नवीन आदेशामुळे दवाखाने, टॅक्सी, रिक्षा, चार चाकी वाहने, वस्तू पुरवठा, शहरी व ग्रामीण उद्योग, शहरी बांधकाम, इतर खासगी बांधकाम, शहरी एकल दुकाने, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, ई-कॉमर्स द्वारे अत्यावश्यक वस्तू पुरवठा, कृषी विषयक उपक्रम, बँका आणि वित्तीय सेवा, कुरियर आणि पोस्ट सेवा, तातडीच्या वैद्यकीय कारणासाठीचा प्रवास, केस कर्तनालय, सलुन, स्पा, घरपोच सेवा देणारे खाद्यगृह, दुय्यम निबंधक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय सुरू होणार आहेत.

Comments
Post a Comment